Maratha Reservation: बांबवडेत 3 तास रास्ता रोको, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांच्या रांगा

0

बांबवडे : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या बांबवडे येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बांबवडेत कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग सुमारे तीन तास रोखून धरला.

यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या सहा किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. किरकोळ बाचाबाची वगळता रस्ता रोको आंदोलन शांततेत पार पडले. तीन तास महामार्ग रोखण्याची ही पहिलीच घटना आहे.

बांबवडे येथे सकाळपासूनच परिसरातील प्रत्येक गावातील युवक मोर्चाने येऊन रास्ता रोकोमध्ये सामील होत होते. आंदोलक भर उन्हात रस्त्यात ठाण मांडून बसले होते. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठायचं नाही ही भूमिका सर्वांनी घेतली होती.

यावेळी तहसिलदार रामलिंग चव्हाण, पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आक्रमक आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांना आमरण उपोषणास बसलेल्या सावंत यांना वैद्यकीय सुविधा पुरवत नसल्याबद्दल जाब विचारला. शेवटी उपोषणकर्ते सावंत व ज्येष्ठ नेते भाई भरत पाटील यांनी विनंती करून रास्ता रोको उठवण्याची विनंती केली व रास्ता रोको समाप्त झाले.

यावेळी भाई भरत पाटील, नामदेव गिरी, सरपंच भगतसिंग चौगुले, उपसरपंच स्वप्निल घोडे- पाटील, सुरेश म्हाऊटकर, सचिन मुडसिंगकर, अमर पाटील, सरपंच आनंदा पाटील, संजय पाटील, जालिंदर पाटील, बाबा लाड, विष्णू पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 02-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here