चिपळुणात मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण

0

चिपळूण : चिपळूण तालुका सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. चिपळूण शहरातील प्रांत कार्यालयासमोर सकाळी हे उपोषण सुरू झाले.

विशेष म्हणजे राज्यात आमदार, खासदारांना गावबंदी असताना चिपळुणात झालेल्या लाक्षणिक उपोषणाला मात्र स्थानिक आमदार माजी आमदार व विविध पक्षांचे पदाधिकारी उपोषणाच्या व्यासपीठावर पाहायला मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘आरक्षण मिळायलाच हवे’, ‘मनोज जरांगे यांना पाठिंबा’ अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या. यानंतर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उपोषणाला वाढता पाठिंबा मिळू लागला. व्यासपीठ भरल्यानंतर समोरच्या खुर्च्याही भरल्या.

या उपोषणात शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, बाळा कदम, शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, वैभव खेडेकर, शौकत मुकादम, लियाकत शाह, राजू जाधव हे सहभागी झाले. उद्योजक प्रकाश देशमुख, दिलीप देसाई, सतीश मोरे, सतीश कदम, संतोष सावंत देसाई, निर्मला जाधव, अंजली कदम यांच्यासह शहरातील मराठा बांधव उपस्थित होते. विठोबा साळवी यांनी पोवाडा सादर केला तर संतोष खलाटे यांनी स्फूर्तीगीते गायली.

सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरू होते. सात वाजण्याच्या सुमारास हे लाक्षणिक उपोषण सोडण्यात आले. या दरम्यान दिवसभर उपोषणस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपोषणादरम्यान अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी राजेंद्र राजमाने, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली व शांततेत उपोषण करण्याच्या सूचना केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 03/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here