गुहागर : साखरी आगर जेटीच्या बांधकामाला अखेर प्रारंभ

0

गुहागर : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत गेली १२ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या तालुक्यातील साखरी आगर येथील मच्छीमार जेटीचे काम अखेर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे वाढीव निधी मंजूर होऊनही बांधकामासाठी कोणीही ठेकेदार पुढे येत नव्हता. मात्र, आता मुंबईच्या एका कंपनीने वर्कऑर्डर स्वीकारल्याने जेटीच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याची माहिती रत्नागिरी पतन विभागाकडून देण्यात आली.

साखरी आगर येथील मच्छीमारांना जेटी नसल्याने वर्षानुवर्षे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. जेटी नसल्याने होड्या नांगरणे, मासे उतरविणे शक्य होत नसल्याने परिणामी, रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये त्यांना आपल्या होड्या उभ्या करून ठेवाव्या लागतात. त्यामुळे साखरी आगर ते जयगड हा प्रवास तसेच डिझेल वाहतूक करणे, या सर्व बाबी फारच खर्चिक असल्याने त्यांचे फारच नुकसान होते. येथील मच्छीमारांची ही गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या ठिकाणी जेटीला २०१०-११ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी तिच्या बांधकामाला २.९६ कोटी इतकी प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. २०१२ मध्ये या जेटीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काम सुरू झाल्यानंतर सीआरझेडची परवानगी नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट स्थितीत सोडले होते.

सीआरझेडच्या विळख्यात अडकलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारी बहुतांश ठिकाणी जेटींच्या कामांना मंजुरी होऊन कामे सुरूही झाली. मात्र, साखरी आगर जेटीचे बांधकाम गेली १२ वर्षे रखडल्याने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यानच्या काळात या जेटीच्या कामाचा खर्चही वाढला. या सगळ्यांसाठी त्यांनी वारंवार संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठकाही घेतल्या होत्या. अखेर या कामातील अडसर ठरलेली सीआरझेडची परवानगी मिळून ८ कोटी ४३ लाख इतका निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात जेटीच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती पतन विभागाचे अभियंता नीलेश पाटील यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 03/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here