Maratha Reservation : आरक्षणासाठी दोन महिन्यांचा वेळ, नंतर मुंबई जाम करणार, आर्थिक नाड्या आवळणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

0

जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation Protest) ही शेवटची वेळ असेल, दोन महिन्यांचा वेळ दिला, या काळात सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नाही दिल्यास यांच्या नाड्या आवळणार, मुंबई जाम करणार असा इशारा मनोज जरांगे ( Manoj Jarange) यांनी दिला आहे.

जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, फक्त आमरण उपोषण बंद राहिल असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी भेटायला आलेल्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला जरांगे यांनी 2 जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.

फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना नाही तर राज्यातल्या सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं, त्यासाठी ही शेवटची वेळ असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आतापर्यंत आमच्या समाजाची फसवणूक केली आहे, आता फसवणूक करण्याची ही शेवटची असेल असं ते म्हणाले.

मुंबईच्या नाड्या आवळणार
राज्य सरकारने जर दोन महिन्यात आरक्षण दिलं नाही तर मुंबईच्या नाड्या आवळणार असा इशारा जरांगे यांनी दिला. ते म्हणाले की, काही दगाफटका केला तर मुंबई बंद करणार. कोणत्याच मुद्द्यावर माझं समाधान झालं नाही. तरीही आता सरकारला 55 दिवस दिले आहे. जर सरकारने शब्द पाळला नाही तर यांचे नाक दाबणार. मुंबई जाम करणार आणि राज्य सरकारच्या आर्थिक, औद्यागिक नाड्या आवळणार. चार कोटी मराठ्यांना घेऊन मुंबईत जाणार. मराठे नुसता मुंबईच्या सीमेवर उभे राहिले तरी मुंबईला काही खायला मिळणार नाही.

राज्याचा दौरा करणार
मधल्या काळात राज्यभर दौरा करून मराठ्यांमध्ये एकत्र येण्यासाठी जागृती करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. दोन महिन्यानंतर जर मुंबईमध्ये मोठं आंदोलन करायचं असेल तर त्यासाठी नियोजन केलं पाहिजे, त्याची तयारी करणार असं जरांगे म्हणाले.

दोन महिन्यात शेतीची कामं उरकून घ्या
सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर या काळात कापूस, ऊस आणि इतर शेतीची कामं उरकून घ्या, दिवाळीचा सण गोड करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. त्यानंतर आपल्याला मुंबईला धडक द्यायची आहे असंही ते म्हणाले.

राजकीय नेत्यांना आता गावात घ्या
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावातल्या राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती. ती आता उठवा आणि नेत्यांना गावात घ्या असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. वेळ आला की यांचाही कार्यक्रम करू असा इशाराही त्यांनी दिला.

सरसरट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या
फक्त मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मतावर आपण ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. पारंपरिक परिवार, रक्ताचे नातेवाईक आणि सगेसोयरिक यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यावं असंही ते म्हणाले. तसेच जो मागेल त्या गरजवंताला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आपण मागणी केली असल्याचं ते म्हणाले.

राज्यात नोकरभरती घ्यायची तर आमच्या टक्केवारीनुसार जागा सोडायचं आणि मगच नोकरभरती करायचं ही आपली मागणी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मान्य केल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 03-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here