रत्नागिरी : मराठा समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आजच्या रत्नागिरी तालुका मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. ही संघटना मराठा समाजाची एकजूट आणि ताकद असेल, असे मत सर्वांनी मांडले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मात्र कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध दर्शविण्यात आला.
शहरातील माळनाका येथील मराठा भवन येथे सायंकाळी रत्नागिरी तालुका समाजाची बैठक झाली. या बैठकीला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. महिला वर्गही मोठ्या संख्येने आला होता. समाज एकसंघ ठेवण्यासाठी आणि त्याची ताकद दाखविण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. त्यासाठी संघटनस्थापन करायची का, यावर चर्चा झाली. यावेळी आप्पा देसाई, संतोष सावंत, केशवराव इंदुलकर, राकेश नलावडे, सुधीर भोसले, भाऊ देसाई, कौस्तुभ सावंत, आदी उपस्थित होते. संघटना स्थापन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. सर्वांचे मते जाणून घेतल्यानंतर समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि समाजिक उन्नत्तीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय झाला. यासाठी लवकरच एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समाजासाठी वाहून घेणाऱ्यांना आणि वेळ देणाऱ्यांना संघटनेच्या कार्यकारिणीवर घेतले जाणार आहे. सुरवातीला गावा-गावात जाऊन जागृती केली जाणार आहे.
भोसरे यांनी मराठा आरक्षण का हवे, यावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एकमताने पाठिंबा दर्शविण्यात आला. परंतु मराठा- कुणबी प्रमाणपत्र घेण्यास या बैठकीत विरोध करण्यात आला. ९६ कुळी मराठा आहोत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध असल्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 03/Nov/2023
