मराठा आरक्षणप्रश्नी ८ डिसेंबरला विशेष अधिवेशन बोलवू; मनोज जरांगेंना राज्य सरकारचं आश्वासन

0

मुंबई : सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर राज्य सरकारला वेळ वाढवून देतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी २ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगत ही शेवटची वेळ असेल असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला. गुरुवारी राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे गेलं होतं. त्यानंतर मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं.

महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी समिती काम करेल, असं ठरलं आणि सरकारने ते मान्य केलं आहे. आता वेळ घ्या पण आरक्षण द्या. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, साखळी उपोषण सुरूच राहील, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. मात्र जर सरकारने दगाफटका केला. तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू. चलो मुंबईची घोषणा करून मुंबई बंद करून टाकू. आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक सरकारच्या सगळ्या नाड्या बंद करू, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर असून आगामी ८ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलवू, असं आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंना दिलं. तसेच घाईघाईत आरक्षणाचा निर्णय घेतल्यास कोर्टात टिकणार नाही, अशी समजूत नि. न्यायमूर्तीनी आणि सरकारच्या शिष्टमंडळाने काढली. मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणासाठी डेटा तयार करण्याचं काम सुरु आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितल्याप्रमाणे कार्यवाही करत आहोत. मराठा आरक्षणासाठी एक नवीन आयोग तयार करणार आहोत, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 03-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here