रत्नागिरी : कृषी पायाभूत सुविधा योजनेतील २ कोटी कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0

रत्नागिरी : कृषी पायाभूत सुविधा योजनेत सहभागी होऊन दोन कोटीपर्यंत तारण विरहित कर्ज व ३ टक्के व्याज परतावा असा दुहेरी लाभ मिळवावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले.

येथील अंबर मंगल कार्यालयात स्मार्ट प्रकल्पांतर्गत विभागस्तरीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. माने बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे व माजी आमदार तथा देवगड तालुका आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष अजित गोगटे उपस्थित होते.

यावेळी माने म्हणाले, स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून निवड झालेल्या समूह संस्थांनी काढणी पश्चात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीचे उप प्रकल्प सादर करून भागधारक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. प्रकल्पाचा सुमारे तीन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे प्रकल्प आराखडा तयार करून मान्यता घेणे, जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संपादन प्रक्रिया राबवून प्रकल्प उभारणी करून तो कार्यान्वित करण्यासाठी समयबद्धरीत्या काम करण्याची आवश्यकता आहे. स्मार्टमध्ये सहभागी समूह संस्थांनी जैविक शेती मिशनमध्येदेखील सहभागी होऊन भागधारक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा तसेच कृषी पायाभूत सुविधा योजनेत सहभागी होऊन कोटीपर्यंत तारणविरहित कर्ज व ३ टक्के व्याज परतावा, असा दुहेरी लाभ मिळवावा.

कोकण विभागातील सहा कृषी उत्पादनांसाठी भोगोलिक मानांकन( GI ) नोंदणी प्राप्त झाली असून त्याची वापरकर्ता संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असल्याचेही सांगितले.

संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांनी कृषी विद्यापीठातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठ एकत्रितपणे प्रयत्नशील राहतील, असे सांगितले.

माजी आमदार गोगटे यांनी सांगितले कीकोकणातील जमीन व हवामान फळपिकांच्या लागवडीस पोषक असून, त्याचा लाभ घेऊन निर्यातक्षम उत्पादन घ्यावे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनीगौरवोद्गार काढले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी प्रक्रिया योजनांबाबत मार्गदर्शन केले.
पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक मंगेश कुलकर्णी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

या संमेलनाच्या निमित्ताने आंबा मूल्य साखळीतील उत्पादकांच्या समूह आधारित संस्था ( CBO ), खरेदीदार, प्रक्रियादार, निर्यातदार, निविष्ठा पुरवठादार, बँक, शास्त्रज्ञ, संलग्न विभागाचे अधिकारी इत्यादी एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन चर्चा करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 03-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here