मनोज जरांगेंचे उपोषण मागे, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

0

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, ही मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेली मागणी मान्य करीत गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण स्थगित केले.

यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

शासनाने नेमलेल्या न्या. संदीप शिंदे यांच्या समितीला संपूर्ण राज्यातील अभिलेखांमधील कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेळ द्यावा लागेल, मागसवर्ग आयोगाला नवीन डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागेल, यावर एकमत झाल्याने जरांगे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये, मराठा आरक्षणासाठी गेल्या ९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या प्रक्रियेत माजी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार!, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून न देण्यास जरांगे पाटलांनी विरोध केला. सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती मनोज जरांगे यांना केली. पण जरांगे पाटील २४ डिसेंबर या तारखेवर ठाम राहिले. त्यानंतर तारखेबाबत बराच वेळ चर्चा करण्यात आली. अखेर त्यांनी दोन महिन्यांची मुदत देत असल्याचे म्हटले आहे. तसेच २ जानेवारीनंतर मुंबईचे नाक बंद करु असा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:11 03-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here