मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare) यांनी दिली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना समर्थन दिलं आहे, तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक त्यांनी दिल्याची माहितीही तटकरेंनी दिली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात आम्ही पीटीशन दाखल केलं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केलीय. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यामुळं ते आमच्या सोबत आहेत असं आम्ही मानतो.
राज्यातली जनता अजित पवारांसोबत
सुनील तटकरे म्हणाले की, 2 जुलैला आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नागालँड, झारखंड येथील आमदारांनी देखील समर्थन दिलं आहे. आम्ही राज्यभर दौरा सुरू करत आहोत. पहिला दौरा विदर्भातून असेल. त्यानंतर कोकण पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल. राज्यातील जनता अजित पवार यानी घेतलेल्या निर्णयासोबत आहे.
संसदरत्न नेहमी अदृश्य शक्ती असा सातत्यानं उल्लेख करत असतात. सर्वोच्च न्यायालाने दिलेला अलीकडच्या काळातील निर्णय याचा आधार घेऊन आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतला आहे असं सुनील तटकरे म्हणाले.
सुनील तटकरेंवर कारवाई करावी, सुप्रिया सुळेंची मागणी
खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे.
चार महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी पत्राच्या माध्यमातून खंत व्यक्त केली. कारवाई होत नसल्याने परिशिष्ट दहाचे उल्लंघन होत असल्याची बाब सुप्रिया सुळेंकडून नमूद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 03-11-2023
