रत्नागिरी : मनसे म्हणजे आयत्यावर कोयता आहे, केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यात पटाईत आहे. जयस्तंभ येथे नव्याने करण्यात आलेला शेअर रिक्षा थांबा हा केवळ ना. उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्यामुळे झाला आहे. यासाठी मी स्वतः व अल्ताफ संगमेश्वरी यांनी पाठपुरवा केला आहे असा दावा शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी केलाय. शेअर रिक्षा चालक आणि प्रवाशांच्या मागणीनुसार जयस्तंभ येथून रेल्वेस्टेशन येथे जाण्यासाठी नवीन रिक्षा थांबा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मंजूर केला आहे. यानंतर हा थांबा मनसे ने केलेल्या मागणीमुळे मंजूर झाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला होता. मात्र शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी हा दावा खोडून काढला आहे. शिवसेना प्रणीत रिक्षा संघटना शेअर रिक्षा स्टॉपचे आज उद्घाटन देखील होणार आहे. मात्र उद्घाटनापूर्वीच श्रेयवाद उफाळून आला आहे. या स्टॉपवरील रिक्षा चालकांनी देखील बिपीन बंदरकर यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. या शेअर रिक्षा स्टॉपमुळे प्रवाशांना मोठी सुविधा निर्माण होणार आहे. जयस्तंभ ते माळ नाका भाडे १० रु. लोटलीकर हॉस्पिटल पर्यंत १५ रुपये, जेके फाईल्स पर्यंत २० रुपये, कुवारबाव पर्यंत ३० रुपये, रेल्वे फाटा पर्यंत ४० रुपये तर रेल्वे स्टेशन पर्यंत ५० रुपये असे रिक्षाचे भाडे असणार आहे.
