चिपळूण : कामथे येथील बाळासाहेब माटे उपजिल्हा रुग्णालयातील असुविधेबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अजित कासार यांनी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत कामथे रुग्णालयातील गैरसोय दूर होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला असून रुग्णालयासमोर ते उपोषणाला बसले आहेत.
कामथे रुग्णालयात अनेक असुविधा आहेत. या ठिकाणी अनेकवेळा रुग्णांना योग्य उपचार केले जात नाहीत. औषधे संपली आहेत, असे सांगण्यात येते. याशिवाय रुग्णालयात अस्वच्छता असून अनेकवेळा येथील डॉक्टर जागेवर नसतात. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. अनेकदा रुग्णालयात पाणीदेखील नसते. या विरोधात अजित कासार यांनी हे उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या या उपोषणाला वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदीप सावंत, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते यांनी उपोषणस्थळी भेट देत अजित कासार यांना पाठिंबा दिला. तसेच यावेळी प्रशांत यादव आणि संदीप सावंत यांनी रुग्णालयातील गैरसोयींचा पाढा वाचत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
रुग्णालयातील गैरसोयी दूर करण्याबाबत ठोस कार्यवाही सुरू झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नयनेश दळी, श्रीकांत कांबळी, संजय काजरोळकर, दीपक कांबळी, राकेश शिंदे, रवींद्र पंडव, हरिभाऊ कांबळी आदी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत हे उपोषण सुरूच होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 04/Nov/2023
