रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र येथील अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडविण्यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, उपकेंद्रातील विद्यार्थी, पालक, तेथील प्राध्यापक यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले उपकेंद्रात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपयांचा निधी उपकेंद्राला देण्यात येणार आहे. उपकेंद्रात येणाऱ्यांना आवश्यक माहिती तत्काळ उपलब्ध करुन द्या, येथील शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवा आदि सूचना त्यांनी संबधिताना दिल्या. ही केंद्र व्यवस्थीत सुरु राहतील यासाठी पालकमंत्री म्हणून आपण आवश्यक ती सर्व मदत करु तसेच प्रशासन म्हणून जिल्हाधिकारीही आपल्याला आवश्यक ती मदत करतील असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
