रत्नागिरीः आयुर्वेदिक, होमिओपथी उपचाराने जिल्ह्यातील ५० हजार रुग्णांचे आरोग्य सुधारणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयुष विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन मिळविणारा रत्नागिरी जिल्ह्याचा आयुष विभाग कोकणातील पहिला आहे. एकाच छताखाली सर्व सुविधा, निटनेटकेपणा यामुळेच आयएसओचे मानांकन प्राप्त झाले आहे. देशातील प्राचीन उपचार पद्धतींच्या प्रसाराचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने आयुष विभागाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे पॅथॉलॉजीबरोबरच आयुर्वेद, युनानी व होमिओपथी उपचारांची सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. खासगी ठिकाणी या उपचारांचा व औषधांचा खर्च खप येतो. मात्र, केस पेपरच्या नाममात्र शुल्कात रुग्णांना या सुविधा मिळत आहेत. या उपचार पद्धतीचे बाह्यरुग्ण विभाग सरू झाल्यापासून आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. विविध आजारांमध्ये रुग्णांना याचा फायदा होण्यास मदत झाली आहे. आयुष विभाग सुरू असला तरी, ज्या आजारांच्या उपचारासाठी आयुर्वेद व युनानी उपचार पद्धतीत दाखल करून घ्यावे लागते. याचीसुविधा जिल्हारुग्णालयामध्ये उपलब्धकरुन देण्यात आली आहे. आयुष विभागात पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र पंचकर्मासाठी खोली, योगा हॉल, सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष, डिस्पेन्सरी.स्टोअर रूम उपलब्ध झाली आहे.आयुर्वेद व युनानी उपचारपद्धतीत काही आजारांच्या उपचारासाठी रुग्णांना दाखल करून उपचार केले जातात. त्या उपचारांचा रुग्णांना लाभ देणे यामुळे शक्य झाले आहे. सन २००५ पासून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आयुष उपचार पध्दती सुरु करण्यात आली. परंत स्वतंत्र कक्ष नसल्याने उपलब्ध वार्डमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करावे लागत होते. तर रुग्णांनाही या उपचार पद्धतीची माहिती मिळत नव्हती. डॉ. अश्फाक काझी जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र आयुष विभागासाठी प्रयत्न सुरु केले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांच्या प्रयत्नातून सुसज्ज आयुष विभाग तयार करण्यात आला. जानेवारी २०१९ पासून हा कक्ष कार्यान्वित झाल्याने आयुष अंतर्गत सर्व उपचार पद्धती येथे सुरु झाल्या आहेत. आयुष विभागाच्या कार्यपद्धतीची दखल घेऊन त्यांना आयएसओ मानांकन देण्यात आले आहे. यासाठी डॉ.आश्फाक काझी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. पूजा संसारे, डॉ. तन्वीर शेख, डॉ. निशाद काझी, योगतज्ज्ञ सीमा साळवी यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
