Ratnagiri : कारवांचीवाडी- रेल्वेस्टेशन रस्त्यावर धुळीचे साम्राज्य..

0

वाहनचालक, पादचारी, दुकानदार हैराण

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. परंतु या कामामुळे कारवांचीवाडी ते रेल्वे स्टेशन या भागातील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात धूळ उसळत आहे. या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी तसेच दुकानदार हैराण झाले आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला लागत आहे. महामार्गावरील ही ‘धूळवड वाहनचालकांसह प्रवाशांनाही कमालीची डोकेदुखी ठरत आहे.

गेले पंधरा-वीस दिवस या भागातील सर्व्हिस रोडवरील डांबरीकरण अखडून ते ग्रिटप्रमाणे बारिक करण्यात आले व रस्त्यावर सर्वत्र पसरवून त्यावर रोलर फिरवून रस्त्याची लेव्हल करण्यात आली. या भागात अचानकपणे रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने रस्ता लवकरच होईल, अशी अपेक्षा होती. पण पंधरा ते वीस दिवस उलटले तरीही काम अर्धवट स्थितीत आहे. चांगला असलेला सर्व्हिस रोड उखडून केवळ खड़ी व ग्रीटचे मिश्रण रस्त्यावर सर्वत्र पसरवल्याने दुचाकी चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे.

रत्नागिरी ते हातखंबा हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच रस्त्याच्या बाजूला छोटी-मोठी हॉटेल्स दुकाने असल्याने या धुळीचा त्रास येथील दुकानदारांना देखील होत आहे. नागरिकांना व वाहनधारकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेऊन काम करणे गरजेचे आहे. तसेच ज्यावेळी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन असेल त्यावेळी रस्ता खोदाई करण्याचे काम सुरू करणे अपेक्षित आहे. परंतु या ठिकाणी रस्त्यांची खोदाई करून त्यावर खडी पसरवून रस्ता अर्धवट स्थितीत ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावरून सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फिरत असतात. मात्र त्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे.

धुळीने मोठा अपघात होण्याची शक्यता
या रस्त्यावरून ट्रक, एसटी कारचालक अशा मोठ्या गाड्यांचे चालक गाडीच्या काचा बंद करून भरधाव वाहने चालवताना दिसून येतात. या गाड्यांच्या मागून प्रचंड उसळणारी धूळ दुचाकी चालकांच्या नाका-तोंडात जाते. काही वेळेला तर या धुळीने पुढील वाहने दिसेना, अशी स्थिती निर्माण होते. ही धूळ डोळ्यात जाऊन दुचाकी चालकांचे अपघात देखील झालेले आहेत. उसळणान्या प्रचंड धुळीमुळे याठिकाणी केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँक्रीटीकरण करा’
धूळ उसळत असल्याने कॉन्ट्रॅक्टरकडून सकाळ व संध्याकाळी रस्त्यावर पाणी मारले जाते. जमिनीने पाणी शोषून घेतल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. पाण्यावरून दुचाकी घसरून पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे पाणी मारण्याची उपाययोजना कुचकामी ठरत आहे. रस्त्यावर पाणी मारून काळजी दाखण्याऐवजी या भागातील रस्त्याचे तातडीने काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी वाहनचालक व प्रवासीवर्गाकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 20/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here