जातीनिहाय जनगणना आवश्यक : खासदार उदयनराजे भोसले

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही भेदभावाला थारा दिला नाही. जनगणना करा आणि आवश्‍‍यक आहे, त्‍याला आरक्षण द्या. मराठा म्‍हणून बोलत नाही. सगळी जण गुणवत्तेबाबत विचार करू लागले असून, मलाही वाटते गुणवत्तेवर आधारित आरक्षण असावे.

आज प्रत्‍येक जण म्हणत आहे, आम्‍ही इतके. आम्‍ही तितके. हे टाळायचे असेल आणि सर्वांना न्‍याय, अधिकार मिळायचा असेल, तर जातीनिहाय जनगणना आवश्‍‍यक आहे. ती झाली की देऊन टाका ज्‍याचे त्याला जे पाहिजे ते. कशाला वाद. हात जोडून सगळ्यांना विनंती करतो. काय ते प्रश्‍‍न मिटवा, नाही तर देशाचे तुकडे होतील. वाट लागायला वेळ लागणार नाही, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, मनोज जरांगे आज राज्‍यात फिरत आहेत. का फिरत आहेत. कशासाठी फिरत आहेत. कशामुळे ही वेळ आली. याचा विचार प्रत्‍येकाने करणे आवश्‍‍यक आहे. कुणाचेही समर्थन करत नाही. मनोज जरांगे आरक्षणासाठी मरायला तयार झाले. का, कशासाठी? का तर अन्‍याय झालाय म्‍हणून. जनगणना करा. कोणावरही अन्‍याय करू नका, असे माझे म्‍हणणे आहे, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

जातीय तेढ कशामुळे आणि कोणामुळे वाढला, याचा शोध घेणे आवश्‍‍यक आहे

जातीय तेढ कशामुळे आणि कोणामुळे वाढलाय, याचा शोध प्रत्‍येकाने घेणे आवश्‍‍यक आहे. प्रश्‍‍न सोडवणार नसाल तर माणसाने जगायचे कसे, अशी विचारणा करत, प्रत्‍येकाला जगण्याचा, चांगले शिक्षण घेण्‍याचा अधिकार आहे. तो मिळालाच पाहिजे. त्‍यासाठी जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. काय ते प्रश्‍‍न एकदा मिटवा. नाही तर देशाचे तुकडे होतील, वाट लागयला वेळ लागणार नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले.

दरम्यान, जालना येथे झालेल्‍या ओबीसी मेळाव्‍यात मराठा समाजाचे दीडशे आमदार आम्‍ही पाडू, असे वक्‍तव्‍य करण्यात आले होते. याबाबत उदयनराजे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, पाडा… पाडा… मी म्‍हणतो. अजून काय बोलू. मी तर काय निवडणुकीला उभा राहणार नाही, असे सांगत उदयनराजेंनी त्‍या विधानाची खिल्‍ली उडवली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 20-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here