उरण : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) व मधुबन कट्ट्याच्या माध्यमातून महिन्याच्या प्रत्येक १७ तारखेला उरण शहरातील विमला तलाव (गार्डन) येथे कविसंमेलन भरविले जाते. या कविसंमेलनात युवक विद्यार्थी यांच्यासह ज्येष्ठांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी विमला तलाव येथे संध्याकाळी ५.३० ते ७ या वेळेत कवी संमेलन उत्साहात झाले.
या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. साहेबराव ओहोळ तर स्वागताध्यक्ष भरत पाटील होते. कवितेचा विषय बोली भाषा आणि आली दिवाळी होता. या कवी संमेलनात अनुज शिवकर, भगवान म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, संग्राम तोगरे, चंद्रकांत कडू, अजय शिवकर, सी. बी. म्हात्रे आदींनी कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, अॅड. मच्छिंद्र घरत, सूर्यकांत दांडेकर, डॉक्टर प्रीती बाबरे, मारूती तांबे, चंद्रकांत मुकादम आदि मान्यवर उपस्थित होते.
एन आय हायस्कूल शाळेचे चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योजक सदानंद गायकवाड तसेच लायन्स क्लब उरणचे अध्यक्ष तथा एन आय स्कूल (प्राथमिक) उरणच्या मुख्याध्यापिका निलिमा विलास नारखेडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील यांनी १०० व्या कविसंमेलना निमित्त राज्य स्तरीय काव्य स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेत राज्यातील १०० कवींना प्रवेश दिला जाईल. त्याच प्रमाणे लिखित साहित्य मुखपृष्ठ स्पर्धा व उरण कोमसाप काव्य संग्रह, कथा कांदबरी, सामाजिक लेखन पुरस्कार दिले जातील. या बाबत लवकरच अधिकृत निवेदन दिले जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 20-11-2023
