4 राज्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच भाजपची पसंती

0

◼️ मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांमधल्या प्रचारात फडणवीस यांची चलती

मुंबई : देशातल्या 4 प्रमुख राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत भाजपच्या प्रचाराची धुरा मात्र महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस यांच्या शिरी असल्याचं दिसतंय. कारण, 3 राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, येत्या काही दिवसांत अजून प्रचारसभा फडणवीस घेणार आहेत. राष्ट्रीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर यामुळे पुन्हा एकदा यानिमित्ताने शिक्कामोर्तब झालंय.

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार हा शिगेला पोहोचलाय. या राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारासाठी प्रचारप्रमुख म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मागणी येत असल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत फडणवीस यांच्या 3 राज्यांमध्ये 15 सभा आणि रोड शो झाले आहेत. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत. त्यामुळे देशातल्या भाजपच्या आश्वासक नेत्यांपैकी एक नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच पाहिलं जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कुठे झाल्या सभा?
मध्यप्रदेशमध्ये 18 सप्टेंबर, 10 आणि 15 नोव्हेंबर असे 3 दिवस 3 दौरे झाले आहेत. धार, इंदोर, महू, बुरऱ्हाणपूर, पांढुर्णा, सौंसर या ठिकाणी एकूण 8 सभा आणि रोड शो देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. तर, छत्तीसगडमध्ये 30 ऑक्टोबरला 1 दिवस 1 दौरा झाला. धमतरी, रायपूर येथे 2 सभा आणि रोड शो फडणवीसांनी केले. राजस्थानमध्ये 14 सप्टेंबर 1 दिवस 1 दौरा पार पडला. केसरी, नासिराबाद, किशनगड, अजमेर उत्तर येथे एकूण 5 सभा फडणवीसांनी घेतल्या. तर, पुढच्या आठवड्यांत राजस्थान आणि तेलंगणा राज्यांमध्ये त्यांचे दौरे आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती का?
भाजपने मध्यप्रदेशसह इतर तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा मनसुबा आखलाय. या सगळ्याच राज्यांमधल्या प्रचारात भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. पण, भाजपच्या या प्रचाराचं महाराष्ट्र कनेक्शन देखील आहे. कारण, देवेंद्र फडणवीस स्वतः या राज्यांमध्ये जाऊन झंझावाती प्रचार दौरे करतायत. बिहार, गोवा या राज्यांमध्ये भाजपला बळकट करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी कळीची भूमिका पार पाडली होती. गोव्यात अशक्य वाटत असलेला विजय त्यांनी खेचून आणला होता. तर, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापेक्षा जास्त जागा भाजपने मिळवल्या होत्या. बिहारच्या प्रचाराची धुरा देखील फडणवीस यांनीच पेलली होती. त्यामुळे देशातल्या राजकारणात आश्वासक नेतृत्व म्हणून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना आता पक्षातूनही तितकीच ताकद मिळतेय. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पुढे केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. दरम्यान, सध्याच्या निवडणूक प्रचार सभा आणि दौरे करताना फडणवीस यांना स्थानिकांनाकडूनही पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 20-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here