चक्रीय वाऱ्यामुळे राज्यात पावसाची शक्यता..

0

पुणे : अरबी समुद्रामध्ये चक्रीय वाऱ्यामुळे राज्यातील कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील वातावरण येत्या आठवड्यात ढगाळ राहणार आहे. या वातावरणामुळे २३ नोव्हेंबरनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दोन-तीन दिवस आकाश निरभ्र राहील आणि हवामान कोरडे असणार आहे.

कार्तिक एकादशी ते कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा (दि. २३ ते २६ नोव्हेंबर) दरम्यान अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असेल. तसेच मर्यादित क्षेत्रात रब्बीतील ज्वारी हरबरा पिकांना वरदान ठरु शकणाऱ्या मध्यम पावसाची शक्यता जाणवते. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचीच शक्यता अधिक जाणवते व त्यामुळे तेथे थंडी कमी होईल, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

आजपासून (दि.२०) पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (दि. ५-६ डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळे महाराष्ट्राला त्याचा धोका नाही, आणि त्यापासून पाऊस होण्याची शक्यता नाही. सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो, तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. डिसेंबर मधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली आहे, असेही खुळे म्हणाले.

असे राहिल किमान तापमान

येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत १४ ते १६ डिग्री दरम्यान किमान तापमान राहण्याची शक्यता आहे. खान्देशात थंडीचे प्रमाण अधिक असेल. सध्या तरी किमान तापमानात वाढ झालेली पहायला मिळत असून, पुण्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 20-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here