रत्नागिरी : माझे समायोजन शासन जबाबदारी, एक रुपयाचा कडीपत्ता शासन झाले बेपत्ता, एकच नारा कायम करा, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीने रत्नागिरीत फेरी काढण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यिका यांनी आरोग्यसेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यांनी मुंबईतील आझाद मैदानातही जोरदार आंदोलन केल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रातील आरोग्यसेवेवर परिणाम झाले आहेत. विशेष म्हणजे आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका या कामबंद आंदोलनात उतरल्याने तेथील आरोग्यसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत; मात्र शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यातील सर्वच उपकेंद्र व आरोग्यकेंद्रांतील आरोग्यसेविका संपात गेल्याने ग्रामीण आरोग्ययंत्रणा विस्कळीत झाली आहे. सलग ३ दिवस जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन झाले.
या आंदोलनाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला तसेच तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवू, असेही आश्वासन दिले.
कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे साडेचारशेहून अधिक लोकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद उपकेंद्र स्तरावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गावभेटी देणे, लसीकरण मोहीम जागृती करणे, साथरोगांचा सर्व्हे करणे, समुदाय आरोग्य अधिकारी, सकाळच्यावेळी उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे, आरोग्यविषयक अहवालांची ऑनलाईन नोंदणी करणे यासारखी कामे केली जातात.
अशी झाली फेरी
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात शासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीने रत्नागिरीत फेरी काढली. जिल्हा परिषदेपासून सिव्हिल हॉस्पिटल, पालिकेवरून ही फेरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. तेथून ती पुन्हा जिल्हा परिषदेकडे गेली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 21/Nov/2023
