राजापूर : तुळसवडे ग्रामपंचायतीची फेरचौकशी होणार

0

राजापूर : तालुक्यातील तुळसवडे ग्रामपंचायतीचे सदस्य संजय कपाळे यांनी तुळसवडेचे सरपंच आणि ग्रामसेवकांबाबत केलेल्या तक्रारीप्रकरणी सविस्तर मुद्देनिहाय सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी राजापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबाबतची माहिती कपाळे यांनी दिली.

कपाळे यांनी तुळसवडे सरपंच, ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती. मात्र, पंचायत समिती प्रशासनाने थातूरमातूर चौकशी करत चौकशीचा फार्स केल्याचा आरोप करत या प्रकरणी तालुका पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

या प्रकरणी योग्य चौकशी व्हावी म्हणून त्यांनी पंचायत समितीसमोर उपोषणही छेडले होते. मात्र, त्यानंतरही संबंधितांची चौकशी होऊन कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याला उत्तर देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समितीमार्फत नेमण्यात आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल अतिशय मोघम असल्याचे नमूद करत फेरचौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कपाळे यांना पाठवले आहे. आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे सुस्पष्ट चौकशी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसे न झाल्यास हा विषय मंत्रालय स्तरावर नेऊन त्याची तड लावणार असल्याचे कपाळे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 21/Nov/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here