Maharashtra Kesari : नांदेडचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी

0

धाराशिव : हजारो प्रेक्षकांच्या गजरात मुख्य महाराष्ट्र केसरीच्या किताबी लढतीत नांदेडच्या शिवराजने उत्कृष्ट खेमे डाव करीत व दुहेरी पटांचा गुणांसाठी आधार घेत नाशिकच्या हर्षवर्धनचा ६-० असा एकतर्फी पराभव करीत मानाची महाराष्ट्र केसरी गदा दुसऱ्यांदा आपल्या नावावर कोरली.

त्यामुळे हर्षवर्धन उपमहाराष्ट्र केसरीपदी समाधान मानावे लागले.

धाराशिवच्या तुळजाभवानी जिल्हा स्टेडियममध्ये सोमवारी रात्री अंतिम झुंजी झाल्या. यातील किताबी लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा ६-० असा पराभव केला. सामन्याला सुरुवात होताच दोघेही अंदाज घेत होते. शिवराजला घाम आल्याने हर्षदने पंचांना विनवणी केली. त्यानंतर घाम पुसून मैदानात आलेल्या शिवराजने अटॅक करण्यास सुरुवात केली. शिवराजने हर्षदला रेडझोन बाहेर ढकलल्याने त्याचे गुणांचे खाते उघडले. त्यांनतर पंचांनी हर्षदला पॅसिव्हटीची वाॅर्निंग दिली. त्यानंतर परत शिवराजने एक गुण कमवत मध्यंतरांपर्यंत २ गुणांची आघाडी घेतली. दुसर्या हाफमध्ये परत हर्षदला बाहेर ढकलल्याने पंचांनी शिवराजला एक गुण दिला. हर्षदच्या तगड्या अटॅकला शिवराजने उत्कृष्ट डिफेन्स करत दाद दिली नाही. परत पंचांनी शिवराजला पॅसिव्हटीची वाॅर्निंग दिली. त्यानंतर मात्र शिवराजने आक्रमक होत परत एक गुण कमावला. त्यानंतर शिवराजने खेमे डावावर दोन गुणांचा कमाई करत आपली आघाडी भक्कम केली. भारंदाजही मारण्याचा शिवराजनेे प्रयत्न केला, परंतु तो फसला. हर्षवर्धनने आक्रमकता दाखिवली असली तरी त्याला शिवराजने छेद दिला.

तत्पूर्वी गादी विभागातील अंतिम फेरीत नांदेडच्या शिवराज राक्षेने मुंबई उपनगरच्या पृथ्वीराज मोहोळचा १०-० असा पराभव केला. शिवराजने काऊंटर अटॅक करत दोन गुण घेतले. त्यानंतर बगलेत हात घालून लपेट डावावर पुन्हा दोन गुणांची कमाई केली. दुसर्या डावात ६ गुणांची कमाई करत शिवराजने तांत्रिक गुणांच्या आधारे १०-० ने विजय मिळविला. माती विभागातील अंतिम सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धनने हिंगोलीच्या गणेश जगतापचा ६-२ ने पराभव केला. सुरुवातीलच सदगीरने खेमे डावावर दोन गुणांची आघाडी घेतली. मध्यांतरानंतर गणेशने बाहेर ढकलत एका गुणाची कमाई केला. त्यानंतर हर्षवर्धनने झोळी डावावर दोन गुण कमावले. हर्षवर्धन कुस्ती टाळत असल्याने पंचांनी गणेशला एक गुण दिला. त्यानंतर खाली बसत हर्षवर्धनने दोन गुण कमावले, ही कुस्ती ६-२ अशी हर्षवर्धनने आपल्या नावावर केली.

हर्षवर्धनला झाली दुखापत…

किताबी सामन्यात हाफ टाईमनंतर हर्षवर्धन सदगीरला शिवराज राक्षेने झोनबाहेर ढकलले. या प्रयत्नात हर्षवर्धनच्या कोपऱ्यास दुखापत झाली. यामुळे जवळपास दोन मिनिटे सामना थांबला होता. यानंतर हर्षवर्धनने दुखापतीतून स्वत:ला सावरत पुन्हा आक्रमक चढाई केली.

दोघेही एकाच तालमीचे पठ्ठे…

शिवराज राक्षे व हर्षवर्धन सदगीर हे दोघेही पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील अर्जूनवीर काका पवार यांचे पठ्ठे आहेत. २०१९ सालच्या महाराष्ट्र केसरीतही सदगीर व शैलेश शेळके यांच्या रुपाने असा योग घडून आला होता.

योगेश्वर दत्तच्या हस्ते पारितोषिके…

किताबी लढतीतील विजेता मल्ल शिवराजला ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त याच्या हस्ते चांदीची गदा व स्कॉर्पिओ बहाल करण्यात आली. तर उपविजेत्या हर्षवर्धनला चांदीची गदा व ट्रॅक्टर प्रदान करण्यात आले. इतर वजन गटातील विजेत्यांना बुलेट व दुचाकी रोख पारितोषिकासह देण्यात आली. यावेळी राज्य कुस्तीगर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष विजय भराटे, आयोजक सुधीर पाटील, जिल्हा संघटनेचे संतोष नलावडे, वामन गाते, आ.कैलास पाटील, माजी खा.रविंद्र गायकवाड उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 21-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here