‘होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे’; राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले..

0

मुंबई : होय, माझ्या पाठिशी मोठी शक्ती आहे. त्यांनी काय चूक केली, त्यांनी बरोबर सांगितले. माझ्या पाठिशी मराठा समाजाची, सामान्य मराठ्याची शक्ती आहे. दुसरी कोणतीही शक्ती माझ्यासमोर टिकणार नाही.

मराठा समाजाशी वेदना आणि भावना मांडत आहे. इथे लिहून देणारा कुणी नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

मनोज जरांगे राज्यव्यापी दौऱ्यावर असून, पुणे, कल्याण येथून ते ठाण्यात आले आहेत. मीडियाशी बोलताना मनोज जरांगे यांना राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावेळी बोलताना सदर भूमिका मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे मांडली. तसेच सामान्य मराठे हा लढा जिंकणार आहे. सामान्य मराठे आहेत, म्हणूनच हा लढा इथपर्यंत आला आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री १०० टक्के २४ डिसेंबरच्या आधी मराठा समाजाला आरक्षण देतील. त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट करू. सरकारकडून आम्हाला आशा आहे आणि सरकारवर विश्वासही आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

प्रत्येक वेळेला त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, मी आधी टीका केलेली नाही

छगन भुजबळ सातत्याने मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत. यावर बोलताना, मी आधी टीका केली नाही. प्रत्येक वेळेला त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. व्यक्ती म्हणून आमचा त्यांना विरोध नव्हता. वैचारिक विरोध होता. आता मात्र व्यक्ती म्हणूनही त्यांना विरोध आहे. मात्र, परवा त्यांनी जे जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रकार केले, हे महाराष्ट्रातील जनतेला रुचलेले नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलो होतो, तेव्हा अशाप्रकारे आरक्षण मिळणार नाही असे सांगितले होते. परंतु आता जरांगे पाटील आहेत की त्यांच्यामागे कोण आहे? त्यातून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करायचे असे आहे का? कारण निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी होतायेत. हे इतके सरळ चित्र दिसत नाही. त्यामुळे कालांतराने यामागे कोण आहे हे कळेलच. अशा अनेक गोष्टी पुढे येतात, ज्यामुळे लोक ज्याने त्रस्त आहेत, हे त्यांच्या डोक्यात येताच कामा नये. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीही मुद्दे काढले जातात, असे राज ठाकरे म्हणाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 21-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here