चिपळूण : दिल्लीला फिरण्यासाठी गेलेल्या सावर्डे येथील चौघांचा अपघात झाला आहे. अपघातामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव येथे हा अपघात झाला. भरधाव मोटारीने पार्किंग केलेल्या एका मोटारीसह चौघांना जोरदार धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या चौघांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विकास नलावडे (वय ५८), देवराज मधुकर गरगटे (वय ५०), मनोहर आगवेकर (वय ६२) आणि सचिन कोल्हापुरे अशी जखमींची नावे आहेत.
दक्षिण दिल्लीतील कैलास एन्क्लेव भागात पार्किंगला उभ्या केलेल्या एका मोटारीला दुसऱ्या मोटारीने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती. की, दुसरी मोटार उलटून फुटपाथवरून चालणाऱ्या चौघांना धडकली. हे चौघेजण १७ नोव्हेंबरला सहकुटुंब दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावनला फिरण्यासाठी गेले होते. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये त्यांचा रविवारी (ता. १९) मुक्काम होता. सकाळी पुढील प्रवासासाठी त्यांची बसही तयार होती. रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले अन् फुटपाथवरून चालत असताना अपघात झाला. एक महिला वेगाने आलिशान मोटार चालवत होती. या मोटारीने रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या मोटारीला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मोटार उलटली आणि चौघांना त्याची धडक बसली. यानंतर तातडीने त्यांना एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. विकास नलावडे आणि सचिन कोल्हापुरे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 21/Nov/2023
