मालेगाव : शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना दुसऱ्यांदा मालेगाव न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तीन दिवसांची (ता.२३) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवारी (ता. २०) रोजी पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात पोलिसांनी हजर केले, यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते न्यायालयाच्या बाहेर उपस्थित झाले आहेत. १५ तारखेला डॉ. अद्वय हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता २० नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान सोमवारी डॉ. हिरेंना जामीन मिळतो का नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते, परंतु हिरेंना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाच्या थकबाकीमुळे शिवसेना उपनेते डॉ. हिरे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. रेणुका सहकारी सूतगिरणीसाठी घेतलेले ७ कोटींचे कर्ज थकविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेने मालेगाव रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
गेल्या वेळी पोलिस ठाण्याच्या व न्यायालयाच्या आवारात रात्रीदेखील समर्थकांची मोठी गर्दी केली होती. आज पुन्हा पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.ऐन दिवाळीत हिरेंना अटक झाल्यानंतर हिरे समर्थक आक्रमक झाले होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. हिरेंना पुन्हा तीन दिवसांची कोठडी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 21-11-2023
