रत्नागिरी : शासनाने कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. दोन दिवसांच्या आत सर्व विभागांनी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव सादर करा. तिवरे धरण फुटीने झालेले नुकसान आणि पुनर्वसन याचा वेगळा प्रस्ताव करा आणि इतर लागणाऱ्या मदतीच्या निधीचा वेगळा प्रस्ताव करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात झालेल्या पुरामुळे किती नुकसान झाले व पुनर्वसनासाठी किती निधी लागणार आहे याचा आढावा ध्वजारोहण सोहळ्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत त्यांनी घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, वीज कपनीचे अधीक्षक अभियंता पी.जी.पेठकर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपविभागीय अधिकारी अमीत शेडगे आदिंची उपस्थिती होती. जिल्हयात १७०० मीटर लांबीचे पुलाचे पोच रस्ते खराब झाले आहे. दरड कोसळलेल्या एकूण मार्गाची जिल्ह्यातील लांबी ६००० मीटर आहे. सोबतच ६९४ किमी रस्ता दुरुस्ती व खड्डे भरणे अपेक्षित आहे. अनेक पूल नादुरुस्त झाले असल्याने त्याचीही दुरुस्ती आवश्यक झाली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच आरोग्य केंद्राची दुरुस्ती आदी कामांना निधी लागणार आहे. जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम वेगाने करुन गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांसाठी तो सुरु करा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिले.
