MLAs Disqualification Hearing: शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांची खडाजंगी; वैयक्तिक टीकेवर राहुल नार्वेकर नाराज, नेमकं काय घडलं..?

0

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी राज्याच्या विधिमंडळात सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या सुनावणीवेळी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

मात्र, यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. मात्र, यावेळी केलेल्या वैयक्तिक टीकेवरून विधानसभा अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी उपस्थित आहेत. २४ तारखेपर्यंत शिंदे गटाला वेळ देण्यात आला. कागदपत्र सादर करण्यासाठी हा वेळ देण्यात आला. ठाकरे गटाने कागदपत्रे सादर केली. शिंदे गटाने मात्र कागदपत्रे सादर करण्यास वेळ मागितला. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचे वाचन केले. प्रभूंनी दिलेल्या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रे ठाकरे गटाने सादर केली. ही साक्ष विधिमंडळाकडून नोंदवून घेण्यात आली. त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून एक मोठी स्क्रीन लावण्यात आली होती.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नाराजी

शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादादरम्यान खडाजंगी पाहायला मिळाली. वकिलांच्या दोघांच्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. व्यक्तिगत टीका करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे म्हणत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यातील वैयक्तिक टीकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली. सर्व युक्तिवाद व आक्षेप हे रेकॉर्डवर घेतले जात असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:27 21-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here