कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा, परंपरेमध्ये खंड पाडण्याचा प्रयत्न करू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

0

पंढरपूर : पंढरपूरमधील विठ्ठलाची शासकीय महापूजा कोणी करायची याविषयीचे वाद सुरू आहे. कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नसल्याच्या भूमिकेतून मराठा(Maratha Reservation) आणि कोळी समाज आक्रमक झाला आहे.

आता या वादावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा असून पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पूजेचा मान मिळण्याची शक्यता

पंढरपूरमधील विठ्ठलाची शासकीय महापूजा कोणी करायची याविषयीचे वाद आज मिटण्याची शक्यता आहे. काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या एकत्रित बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मराठा समाजातील सर्व गट एकत्र आल्यामुळे तोडगा दृष्टीपथात आला आहे. मराठा समाजानंतर आज कोळी समाजाची बैठक आहे. त्यात कोळी समाजाचा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसंच दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान मिळेल असंही सांगितलं जातंय. पंढरपूरच्या शासकीय महापूजेनंतर ते त्याचं कुलदैवत असलेल्या निरा नरसिंहपूर येथे जाण्याची शक्यता आहे.

मंदिर समिती कोणता निर्णय घेणार?

23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते होत असते . यंदा दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणाच्या हस्ते पूजा होणार हा पेच सरकार पुढे असताना आता मराठा आंदोलकांनी कोणत्याच मंत्र्याला येऊ न देण्याचा इशारा दिला आहे . कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता मनोज जरांगेंच्या हस्ते करावी, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. त्यामुळे आता मंदिर समिती कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:44 21-11-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here