रत्नागिरी : उज्ज्वला गॅस योजना २०२० मध्ये बंद पडली होती. मात्र, केंद्र शासनाने पुन्हा ही योजना जाहीर केली आहे. तसा आदेश जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त झाला असून जिल्ह्यासाठी २८६ जोडण्या मंजूर झाल्या आहेत. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदयमधील लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. योजते अंतर्गत अवघ्या १०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडसह शेगडी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली.
सर्वसामान्य कुटुंबांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेने मोठा दिलासा दिला होता. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेने सामान्य कुटुंबाला मोठा आधार दिला होता. जिल्ह्यात ८३ हजार ९८० दारिद्र रेषेखालील गरीब कुटुंबांनी योजनेचा लाभ घेतला होता. योजने अंतर्गत त्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले. मात्र, चार वर्षांतच या योजनेला घरघर लागली आणि ती बंद पडली. सुरवातीला लाभ मिळाल्यानंतर पुन्हा गॅस सिलिंडर आहे त्या दरात घ्यावा लागतो. त्यामुळे या योजनेचे लाभासाठी गेल्या काही वर्षांमध्ये एकही अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे आलेला नाही. आता ही योजना पुन्हा सुरू होत आहे. ‘स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील महिलांना मोफत घरगुती एल. पी. जी. गॅस उपलब्ध दिला. त्यामुळे गरजू महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली.
ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिलांचे सक्षमीकरण तर झालेच त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरली. चूल पेटविण्यासाठी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होत होती. परंतु या योजनेमुळे ग्रामीण भागातील घरा-घरापर्यंत एल. पी. जी. सिलिंडर पोहचला. केंद्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२३ ला देशात पुन्हा पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत लाभासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय ४१ हजार ६४१, प्राधान्य क्रम १ लाख ९२ हजार ७९२ एकुण रेशन कार्डधारक ४ लाख ४१ हजार ०९७ लाभार्थी रेशनकार्ड धारक आहेत.
नव्याने ७५ लाख जोडण्या मंजूर
या योजने अंतर्गत देशातील ७५ लाख अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील २८६ जोडण्या मंजूर झाल्या आहेत. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदयमधील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:47 PM 21/Nov/2023
