चिपळूण : पुणे येथील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुरस्काराचे मानधन आपण परग्रस्तांसाठी देत असल्याचे खा. तटकरे यांनी जाहीर केले. राजकीय क्षेत्रात अभ्यासपूर्ण केलेली भाषणे, विविध खात्यांचे मंत्री, कुशल संघटक अशा कार्याची दखल घेऊन आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानने खा. तटकरे यांचा गौरव केला आहे. अत्रे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव झाला. सत्काराला उत्तर देताना खा. तटकरे म्हणाले की, हा पुरस्कार पूरग्रस्तांना समर्पित करीत असून पुरस्काराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग करावे, अशी विनंती त्यांनी आयोजकांना केली. हा पुरस्कार आपल्यासाठी उमेद वाढविणारा, आहे. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूराव कानडे, विश्वस्त डॉ. शौनक कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
