चिपळूण : तिवरे येथील आपद्ग्रस्तांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी आता गावातील कातकरी हेलनवाडीमध्ये या लोकांचे पुनर्वसन होणार आहे. भेंदवाडीतील जमिनीला तडे जात असल्याने महसूल प्रशासनाने तात्पुरत्या पुनर्वसनाची जागा बदलली आहे. दोन कंटेनर तिवरेत दाखल झाले असून, उर्वरित कंटेनर काही दिवसांतच येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन देसाई यांनी दिली. तिवरे येथीलधरणफुटून तब्बल २२ लोकांचा बळी गेला. या घटनेला आता दीड महिना उलटला असताना येथील चाळीस आपद्ग्रस्तांचे कंटेनरमध्ये तात्पुरते पुनर्वसन होणार आहे. सुरुवातीला भेंदवाडीतील मोकळ्या जागेमध्ये पुनर्वसनाचा प्रस्ताव होता. मात्र, या जागेला तडे गेल्याने तहसीलदार देसाई यांनी येथील पुनर्वसनाचा प्रस्ताव रद्द केला. आता तिवरे हेलनवाडी येथील ग्रामस्थ घाणेकर यांच्या जागेत तात्पुरते पुनर्वसन होणार आहे. यासाठी एकूण पंधरा कंटेनर मागविण्यात आले आहेत. यातील तीन दाखल झाले असून, येत्या काही दिवसांत या ठिकाणी पाणी व विजेची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यातील पाच कंटेनरचा खर्च रत्नागिरी जिल्हा बँकेने केला आहे.
