बॅडमिंटनपटू लीन डॅनची निवृत्तीची घोषणा

चीनचा दिग्गज बॅडमिंटनपटू लीन डॅनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला आज अलविदा केले आहे. २ वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता राहिलेल्या लीन डॅनने सोशल मीडियावरुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने चीनच्या सोशल मीडिया वीबोवर लिहिले आहे की ‘२००० ते २०२०, २० वर्षांनंतर मला माझ्या राष्ट्रीय संघाला अलविदा करावे लागत आहे. याबद्दल बोलणे माझ्यासाठी कठिण आहे.’ तसेच चीनी मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार त्याने म्हटले आहे की ‘मी माझ्या आवडत्या खेळाबद्दल पूर्ण वचनबद्ध होतो. माझे कुटुंब, प्रशिक्षक, सहकारी आणि चाहत्यांनी नेहमीच मला साथ दिली, मग तो चांगला काळ असो किंवा कठीण असो. आता मी ३७ वर्षांचा आहे आणि माझी शारीरिक तंदुरुस्ती आणि वेदना मला आणखी संघर्ष करण्यास परवानगी देत ​​नाहीत.’ चिनी बॅडमिंटन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार लीन डॅनने यांनी काही दिवसांपूर्वी औपचारिक सेवानिवृत्तीचा अर्ज सादर केला होता. डॅन मागील काही दिवसांपासून संघर्ष करत होता. त्याला टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यासाठीही संघर्ष करावा लागणार होता. पण त्याचे शरिर त्याला साथ देत नसल्याचे त्याने स्पष्ट केले. लीन डॅनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द २० वर्षांची राहिली. त्याने २००० मध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने २००८ ला बिजिंग ऑलिंपिकमध्ये आणि २०१२ ला लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याबरोबरच त्याने ६ वेळा प्रतिष्ठेची मानली जाणारी ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिप स्पर्धाही जिंकली आहे. तसेच २००६,२००७,२००९,२०११ आणि २०१३ ला त्याने वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धाही जिंकली आहे. त्याचबरोबर त्याने २००५ आणि २००६ ला विश्वचषकात सुवर्णपदकही मिळवले आहे. या व्यतिरिक्तही त्याने अनेक बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here