नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचार घेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र प्रकृती खालावल्यामुळे आज, शनिवारी त्यांना लावण्यात आलेले व्हेंटीलेटर हटविण्यात आले असून ईसीएमओ (एक्सट्राकॉर्पोरियल मेंब्रेन ऑक्सीजीनेशन)वर लावण्यात आले आहे. ९ ऑगस्टला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉक्टरांचे पथक सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. गेल्या काही दिवसांपासून ते उपचारांना साथही देत होते. मात्र, आज शनिवारी त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजते. ‘एम्स’ रुग्णालयाच्यावतीने ९ ऑगस्टला त्यांच्या प्रकृतीसंबंधी मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध केले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही माहिती रुग्णालयाकडून अधिकृतपणे देण्यात आलेली नाही. जेटली यांच्यावरील उपचारादरम्यान राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांची भेट घेतली. १० ऑगस्टपासून जेटली यांच्या प्रकृती विषयी कोणतेच मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी अद्याप गुढ कायम असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ईसीएमओवर रुग्णाला तेव्हाच ठेवले जाते जेव्हा त्याचे हृदय, फुफ्फुसे काम करणे बंद करतात व व्हेंटीलेटरचाही उपयोग होत नाही. ईसीएमओद्वारे रुग्णाच्या शरीरात ऑक्सीजन पोहचवला जातो. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी अद्याप गुढ कायम असल्याची चर्चा आहे. अनेक दिवसांपासून आजारी अरुण जेटली हे गेल्या अनेक दिवसांपासून सॉफ्ट टिशू सरकोमा या प्रकाराच्या कॅन्सरने ग्रासले आहेत. तसेच ते मधुमेहाचेही रुग्न आहेत. जेटली यांचे किडनी प्रत्यारोपण करन्यात आले आहे. सॉफ्ट टिशू कॅन्सरचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात आले होते. वजन कमी करण्यासाठी जेटली यांनी बॅरिएट्रिक सर्जरीही केली आहे. प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या सरकारमध्ये ते सामील झाले नाहीत. अरुण जेटली यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थी चळवळीत ते सक्रिय होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळा त्यांनी अर्थ मंत्रालय सांभाळले. जेटली हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही केंद्रीय मंत्री होते.
