नवी दिल्ली : दिल्लीतील प्रसिद्ध रुग्णालय राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) आज, शनिवारी दुपारी आग लागली. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २२ गाड्या दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. आग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर लागली असली तरी या आगीचा धूर चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत गेला आहे. सध्या एम्स रुग्णालयात माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, बसपाच्या प्रमुख मायावती यांनी एम्समध्ये येवून जेटली यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मान्यवर नेत्यांची एम्समध्ये ये-जा सुरू असतानाच दुपारच्या सुमारास टीचिंग ब्लॉकमध्ये ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीच्या घटनेनंतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.
