जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिका सेवा दशकपूर्तीचा नामवंतांकडून गौरव

➡ दहा वर्षात वाचवले १३ हजारांवर अपघातग्रस्तांचे प्राण

नाणीज : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून व प्रेरणेतून अपघातग्रस्तासाठी सुरू झालेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेला गुरूपौर्णिमे दिवशी दहा वर्षे पूर्ण झाली. या सेवेमुळे १३ हजारांवर अपघातग्रस्तांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे. त्यानिमित्त अनेक नामवंतांनी या सेवेच कौतुक केले आहे. जखमींना पुनर्जन्म देणारी ही सेवा असल्याचे म्हटले आहे. संस्थानने २०१० साली गुरूपौर्णिमेच्या दिवशी महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी चार रुग्णवाहिका मुंबई-गोवा महामार्गावर सुरू केल्या. टप्प्याटप्प्याने संख्या वाढवण्यात आली. आज एकूण २७ रुग्णवाहिका अखंडपणे २४ तास या सेवेत आहेत. राज्यातील मुंबई-गोवा, मुंबई-आग्रा, मुंबई- हैदराबाद, मुंबई-अहमदाबाद कोल्हापूर- नागपूर, पुणे- बंगलोर महामार्गावर आहेत. साधारण जिथे वा ज्या भागात अपघात जादा होतात तिथे त्या ठेवण्यात आल्या आहेत. येथून रस्त्याच्या दोन्ही बाजूला २५-३० किलोमीटरपर्यंत त्या जाऊन जखमींची सेवा करतात. या गाड्यांच्या चालकांचे मोबाईल नंबर त्या त्या भागात जाहीर केले आहेत. याशिवाय संस्थानचा एक नंबरदेखील या सेवेसाठी जाहीर करण्यात आला आहे. जिथे अपघात होतो तेथील नागरीक आपल्या जवळच्या संबंधीत चालकाला निरोप देतात. चालक निरोप मिळताक्षणी घटनास्थळी जातो. तिथे विव्हळत असलेल्या जखमींना स्थानिक लोकांच्या मदतीने रुग्णवाहिकेत घेतो व तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करतो. यामुळे त्या रुग्णांवर त्वरित उपचार सुरू होताता व त्याचे प्राण वाचण्यासाठी या सेवेचा चांगला उपयोग होतो. केवळ वेळेत उपचार मिळाल्यामुळे अनेकांचा पुनर्जन्म झाला आहे. या रुग्णवाहिकांनी महामार्गावरील अपघाताबरोबरच नाशिक व अलाहाबाद येथील प्रयागराज कुंभमेळ्यामध्येही चांगली सेवा बजावली आहे. रुग्णांची नेआण, फिरता दवाखाना या उपक्रमांची तिथे मोठी चर्चा झाली होती. या सेवेचा गौरव करणारी व त्याची उपयुक्तता सांगणारी अनेक नामवंतांची पत्रे संस्थानला प्राप्त झाली आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, खासदार ओमप्रकाश उर्फ पवन राजेनिंबाळकर, गृहराज्यमंत्री अब्दुल सत्तार, उद्योग व पर्यटन राज्यमंत्री आदिती सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे सदस्य आमदार अनिकेत सुनिल
तटकरे, राजापूरचे आमदार राजन साळवी आदींना संस्थानच्या रुग्णवाहिका सेवेचे कौतुक केले आहे. ही सेवा अपघातातील जखमींसाठी कशी उपयुक्त आहे. त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यासाठी कशी मदत झाली आहे. या सेवेची पोलिसांना होणारी मदत, कोरोना काळातही या रुग्णवाहिकांनी बजावलेली सेवा आदींचा त्यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. संस्थानला व जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय रत्नागिरीचे भूतपूर्व जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, विद्यमान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, रत्नागिरी वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक अनिल विभूते, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री कदम, हातखंबा वाहतूक येथील वाहतूक सहाय्या पोलिस निरीक्षक श्री पाटील आदींनी या रुग्णवाहिका सेवेचे कौतुक केले आहे. यापूर्वीही अनेक पीठांचे धर्मगुरू, संत-महंत, सरसंघचालक मोहन भागवत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अशा अनेक नामवंतांनी या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या सेवेमुळे वेळेत उपचार सुरू होऊन प्राण वाचलेले अनेकजण संस्थानचा आदरपूर्वक गौरव करतात. त्यांचे नातेवाईक तर या सेवेमुळे आमच्या माणसांचे प्राण वाचले असे संस्थानला पत्राद्वारे कळवतात. ऋण व्यक्त करतात.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:11 AM 06-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here