लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे हेच भाजपच्या आत्मनिर्भर अभियानाचे काम : पालकमंत्री परब

चक्रीवादळातील नुकसानीकरता रत्नागिरी जिल्ह्याला ११६ कोटी निधी प्राप्त असून ५४ कोटीचं वाटप पूर्ण

रत्नागिरी : ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या नुकसानीसाठी शासनाकडून कोट्यवधींची मदत आली असतानाही आत्मनिर्भरच्या नावाखाली विरोधक कोकणवासीयांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन संयुक्त पत्रकार परिषदेत केला. परब म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात आत्मनिर्भर फेरी आली होती. त्यामधून आत्मनिर्भरच्या नावाखाली कोकणवासीयांची फसवणूक केली जात आहे. निसर्ग वादळात झालेल्या नुकसानीसाठी सरकारने मदत केली नाही, गडचिरोलीत तातडीने मदत पोहोचली असती, पण कोकणात पोहोचली नाही, अशाप्रकारे खोटी माहिती दिली जात आहे. वस्तुस्थिती कोणी सांगत नाही. निसर्ग वादळातील नुकसानीसाठी ३६० कोटी रुपयांची मागणी होती, त्यातील रत्नागिरी जिल्ह्यासाठी ११६ कोटी रुपयांची मदत शासनाने केली. ५४ कोटींचे वाटप झाले, ६२ कोटींचे वाटप सुरू आहे. अशीच मदत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मिळाली आहे. उर्वरित रक्कम येत्या काही दिवसांत कोकणसाठी मिळेल. निसर्ग वादळानंतर नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या निकषात बदल करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी केले. स्वतः मुख्यमंत्री कोकणच्या दौऱ्यावर आले होते आणि कोकणवासीयांना नुकसानभरपाईसाठी भरभरून मदत दिली गेली, यावर कोणीही बोलत नाही. निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना निधीबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी प्रयोगशाळा सुरू केली गेली, त्यावरही कोणी बोलत नाही. कोकणातील आलेल्या निधीपैकी ४६.५१ टक्के वाटप झाले आहे. कोकणात गुंठेवारी शेती केली जाते, त्यामुळे अनेकांची नावे त्यावर असतात. मदत देताना यात अडचण होते. मात्र, अशा प्रकारे अडचण असेल तर नुकसानभरपाई देताना हमीपत्र घ्या, अशी मागणी आम्ही केली आहे, ती मान्य झाली आहे, त्यामुळे आता मदत वाटपात काही अडचण येणार नाही, असेही परब म्हणाले. निसर्ग वादळासारखे वादळ आले तर नुकसान होऊ नये, यासाठी कोकणवासीयांची काळजी घेण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर ‘शेल्टर हाऊस’ उभारण्याची कल्पना आम्ही राबवत आहोत, अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. रायगड आणि रत्नागिरीच्या तुलनेत सिंधुदुर्गात निसर्ग वादळामुळे कमी नुकसान झाले. सिंधुदुर्गात साधारणपणे एक कोटीचे नुकसान झाले, त्यातील ३६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये खाजगी कोविड प्रयोगशाळा करावी, अशी काहींची मागणी होती. परंतु दोन ठिकाणी शासकीय रुग्णालयात ती झाल्यामुळे अनेकांना पोटदुखी झाली आहे. आत्मनिर्भरच्या नावाखाली सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. लोकांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत, परंतु मदतीचे वाटप होत आहे. सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी माझे सातत्याने बोलणे होत आहे आणि उर्वरित मदतनिधीही लवकरच प्राप्त होईल, असे सामंत म्हणाले. पुन्हा निसर्ग वादळासारखे वादळ आले तर नुकसान होऊ नये, समुद्रकिनाऱ्यावर ‘शेल्टर हाऊस’ उभारण्याची कल्पना आम्ही राबवत आहोत, अशी माहितीही सामंत यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here