शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी : शिंदेंना पाठविलेल्या ई-मेलवरून खडाजंगी

0

मुंबई : एकनाथ शिंदे यांना पाठविलेला ई-मेल बनावट असल्याच्या मुद्द्यावरून शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये शुक्रवारी जोरदार खडाजंगी झाली. शिंदे यांचा ई-मेल आयडी बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.

त्यावर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचे वकील देवदत्त कामत यांनी संताप व्यक्त करताना या ई- मेलची शहानिशा करण्याची मागणी केली.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीच्या सहाव्या दिवशी जेठमलानी यांनी प्रभू यांची उलटतपासणी घेतली. तो मेल आयडी विधानसभा डायरीतून घेतल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. त्यावर आपण दि. २२ व २३ जून २०२२ रोजी शिंदे यांच्या या ई-मेलवर व्हीप पाठविला नव्हता, असा आक्षेप जेठमलानी यांनी घेतला. तसेच शिंदे यांचा बनावट ई-मेल तयार करण्यात आल्याचा आरोपही केला.

प्रभू यांचे वकील देवदत्त कामत संतप्त होत म्हणाले, ई-मेल बनावट असल्याचा आरोप करून तुम्ही प्रसिद्धी मिळवत आहात. ई-मेलची तज्ज्ञांकडून खातरजमा करून घ्या. ई-मेल ज्यांनी पाठविला त्यांना सुनावणीत बोलवा.

निवडणूक आयोगाला पाठविलेले पत्रही बनावट
– त्यापूर्वी सकाळी झालेल्या सुनावणीतही शिवसेनेच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविलेले पत्र बनावट असून आयोगाला २ एप्रिल २०१८ रोजी पाठवलेली घटनादुरुस्तीची कागदपत्रेही बनावट असल्याचा आरोप जेठमलांनी यांनी केला.
– त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी समन्स पाठविण्याची मागणी प्रभू यांच्या वकिलांनी केली. तसे पत्रही विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून अपात्रतेच्या कारवाईत सहभागी करून कारवाईला विलंब करण्याचे सुनील प्रभू यांचे डावपेच असून, ते त्यांची लबाडी आणि फसवणूक लपविण्यासाठी असे डावपेच अवलंबत आहेत. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
– उदय सामंत, उद्योगमंत्री

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 02-12-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here