पुन्हा विश्वचषकावर पाय ठेवू शकतो! काहीही अपमानास्पद नव्हते : मिशेल मार्श

0

मेलबोर्न : वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर मिळालेल्या ट्रॉफीवर पाय ठेवून बसल्याचा फोटो प्रकाशित होताच चाहत्यांच्या रोषाला सामोरा गेलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श याने शुक्रवारी खुलासा केला.

‘विश्वचषकावर पाय ठेवण्यात काहीही अपमानास्पद नव्हते, मी पुन्हा असे करू शकतो,’ असे मार्शने म्हटले आहे.

सहाव्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने मार्शचा ट्रॉफीवर पाय ठेवून बसलेला एक फोटो शेअर केला होता. यावर टीका झाल्यानंतर मार्श सेन रेडिओशी बोलताना म्हणाला, ‘फोटोत काहीही अपमानास्पद नव्हते. मी इतका विचारही केला नव्हता. सोशल मीडियातदेखील माझ्या पाहणीत आले नाही, मात्र काहींनी मला वाद निर्माण झाल्याची माहिती दिली.’ पुन्हा असे करणार का, असा प्रश्न करताच मार्श म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर होय!’

भारतीय चाहत्यांना मार्शची ही कृती आवडली नव्हती. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी म्हणाला होता, ‘या ट्रॉफीसाठी जगातील अनेक संघांनी घाम गाळला. जो चषक डोक्यावर घ्यायला हवा होता, तो पायाखाली घेऊन बसताना पाहिले तेव्हा निराशा झाली.’

मार्श पुढे म्हणाला, ‘विश्वचषक जिंकल्यानंतर जे खेळाडू येथे थांबले त्यांच्यावर तो अन्याय होता. भारताविरुद्ध प्रत्येक मालिका मोठी असल्याने ऑस्ट्रेलियासाठी खेळत असल्याचा मला अभिमान आहे. मानवी स्वभावानुसार विचाराल तर आम्ही विश्वचषक जिंकल्यानंतर कुटुंबासोबत आनंद साजरा करण्याची हीच वेळ आहे. यापुढे मोठ्या स्पर्धेनंतर अशा मालिकांचे आयोजन होणार नाही, अशी अपेक्षा आहे.’ ऑस्ट्रेलियाच्या सात खेळाडूंना विश्वचषक आटोपल्यानंतर ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतात थांबावे लागले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 02-12-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here