नवी दिल्ली : पॅरा ऑलिम्पिकमधील भारताला रौप्य पदक मिळवून देणारी महिला अॅथलिट दीपा मलिक आणि आशियाई गेम्स तसेच कॉमनवेल्थ खेळात सुवर्ण पदकाची कमाई करणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया या दोघांना ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर क्रिेकेटपटू रवींद्र जाडेजाला ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुरस्कार समितीने याची आज, शनिवारी घोषणा केली. भारताच्या क्रीडा पुरस्कार समितीने विविध क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करून १६ आणि १७ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिटिक्सपटू दीपा मलिक या दोघांच्या नावाची शिफारस केली होती. तसेच द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी या विविध पुरस्कारासाठी खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आल्यानंतर ते सर्व पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.
