रत्नागिरी जिल्ह्यातील २७९ गावे ‘हर घर जल’ गाव घोषित

0

रत्नागिरी : ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ‘हर घर जल योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 3 लाख ३२ हजार ६९ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांची उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. जिल्ह्यातील २७९ गावे ‘हर घर जल’ गाव म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

प्रत्येक कुटुंबाला घरामध्ये नळाद्वारे नियमित, शुद्ध व ५५ लिटर प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने ‘जलजीवन मिशन’ची सुरवात केली. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १०० टक्के कुटुंबांना २०२४ पर्यंत नळजोडणी देऊन शाश्वत पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाणी यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे. या निकषानुसार पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांना शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर जल’ गाव म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम ७३.८५ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १ हजार ३४३ गावातील 4 लाख ४९ हजार ६६७ कुटुंबांना ‘हर घर जल’ योजनेतून नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ९७५ गावातील पाणीयोजनांची कामे सुरू आहेत. आतापर्यंत कामे पूर्ण झालेल्या गावातील ३ लाख ३२ हजार ६९ कुटुंबांना नळजोडणी देण्यात यश आले आहे.

येत्या काही दिवसात या योजना कार्यन्वित होतील तसेच उर्वरित 1 लाख १७ हजार ५९८ कुटुंबांना मार्च २०२४ अखेर नळजोडणी देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची धडपड सुरू आहे. जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. त्यामुळे टंचाईग्रस्तांना टँकरने पाणीपुरवठा करण्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. आता ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:48 02-12-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here