सुरुची अडारकर-पियुष रानडे अडकले लग्नबंधनात..

0

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) आणि पियुष रानडे (Piyush Ranade) गुपचूप लग्नबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीने खास फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.

सुरुची आणि पियुष दोघेही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. सुरुची आणि पियुषचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सुरुची अडारकरने शेअर केले लग्नसोहळ्याचे फोटो

सुरुची अडारकरने लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पियुष तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,”आनंदी दिवस”. सुरुची आणि पियुषच्या फोटोंवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. सुरुची आणि पियुषने लग्नात दाक्षिणात्य लूक केला असून मराठमोळ्या पद्धतीत ते लग्नबंधनात अडकले आहेत.

‘का के दुरावा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. तिने साकारलेली आदितीची भूमिका चांगलीच गाजली. तर दुसरीकडे ‘अस्मिता’ या मालिकेच्या माध्यमातून पियुष रानडे घराघरांत पोहोचला. सुरुची नुकतीच ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर दुसरीकडे ‘काव्यांजली’ या मालिकेच्या माध्यमातून पियुष सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पियुषचं तिसरं लग्न…

पियुषचं हे तिसरं लग्न आहे. अभिनेत्री शाल्मली टोळ्येसोबत (Shalmalee Tolye) तो लग्नबंधनात अडकला होता. पण काही कारणाने ते विभक्त झाले. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2016 रोजी त्याने मयुरी वाघसोबत (Mayuri Wagh) दुसरं लग्न केलं. ‘अस्मिता’ या मालिकेच्या सेटवर मयुरी आणि पियुषची छान मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर आता अभिनेत्याने सुरुची अडारकरसोबत तिसरं लग्न केलं आहे.

पियुष आणि सुरुची यांनी ‘अंजली’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवर ते प्रेमात पडले असावे. आजवर त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो कधीही शेअर केलेले नाहीत. त्यामुळे चाहत्यांसाठी हा सुखद धक्का आहे. पियुष आणि सुरुचीच्या फोटोंवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 06-12-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here