कोयना अवजलावर प्रथम कोकणाचा हक्‍क

0

रत्नागिरी : कोयना धरणातून वीज निर्मितीनंतर वाशिष्ठीला मिळणार्‍या पाण्यावर (अवजल) प्रथम कोकणाचा हक्‍क आहे. याबाबत स्थापन करण्यात आलेल्या पेंडसे समितीनेही या अवजलातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाणी योजना राबवण्याचा अहवाल शासनाला दिला आहे. त्यामुळे हे अवजल प्रथम कोकणाला मिळाले पाहिजे, त्यानंतर ते राज्याला द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे म्हाडा अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी सांगितले. शहरातील हॉटेल विवेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, कोयनेचे 1911 द.ल.घ.मी. पाणी दरवर्षी वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीत सोडण्यात येते. कै. माजी आ. नाना जोशी, माजी कुलगुरू श्रीरंग कद्रेकर, भास्कर शेट्ये, अ‍ॅड. कल्पना भिडे यांनी कोयनेचे अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मिळावे, अशी भूमिका मांडली होती. याबाबत 2005 साली आपण विधानसभेच्या सभागृहात पिटीशन दाखल केली होती. शासनाने 15 ऑक्टोबर 2005 साली पेंडसे समिती नियुक्‍त केली. या समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे होते. सहा सदस्यीय या समितीने 27 सप्टेंबर 2006 रोजी आपला अहवाल शासनाकडे सादर केला. यामध्ये हे अवजल रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला दिल्यास येथील 11 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. स्थानिक जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल. याचबरोबर येथे स्वयंरोजगारही उपलब्ध होऊन येथील स्थानिक लोकांना येथेच रोजगार उपलब्ध होईल. पर्यटन वाढीलाही चालना मिळेल. असे नमूद करण्यात आले होते. 27 जुलै 2007 रोजी आपण अवजलाचा औचित्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. डिसेंबर 2007 मध्ये याबाबत लक्षवेधीही मांडली होती. सन 2007-08 साली योजनेसाठी 1200 कोटी खर्च अपेक्षित होता. यासाठी सर्वेक्षणही झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अवजल मराठवाडा, विदर्भात नेण्याची नुकतीच घोषणा केली आहे. याला आपला विरोध नाही. मात्र, या पाण्यावर प्रथम कोकणाचा हक्‍क आहे. महाराष्ट्र हा एकसंघ आहे. पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पाणी दिल्यावर उर्वरित पाणी राज्याला द्यावे, अशी विनंती आपण त्यांना करणार आहोत. जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य संपावे यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना भेटणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here