‘ग्रामीण रोजगार हमी’ योजनेतील कंत्राटी कर्मचारी तीन महिने वेतनविना

0

देवरूख : रत्नागिरी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचार्‍यांचे गेली तीन महिने वेतन झालेले नाही. यामुळे या कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे 50 कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने रुजू करण्यात आले आहेत. या कर्मचार्‍यांच्या वेतनाची सदैव बोंब असते. गेले तीन महिने या कर्मचार्‍यांचे वेतनच करण्यात आलेली नाही. याबाबत कर्मचारी वर्गाने जिल्हाधिकारी  यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असतानाही वेतन झाले नसल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. अशाच प्रकारे कर्मचार्‍यांचे गतवर्षीही वेतन रखडले होते. यावेळी या कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ कर्मचार्‍यांचे वेतन जमा केले होते. यावर्षी हिच परिस्थिती या कर्मचार्‍यांवर ओढवली आहे. अनेक कर्मचारी हे भाड्याने वास्तव्याला असतात. तसेच काही कर्मचारी हे एसटी प्रवास करून कामावर येत असतात. गेले तीन महिने वेतन न झाल्यामुळे त्यांना कामावर येण्यासाठीचीसुद्धा मौताद बनली आहे. याचबरोबर कुटुंबवत्सल असलेल्या कर्मचार्‍यांना जिन्नस भरण्याचा सुद्धा प्रश्न उभा राहिला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये सहाय्यक कर्मचारी अधिकारी व डाटा ऑपरेटर अशा पद्धतीने हे कर्मचारी सेवेत घेतलेले आहेत. जिल्हाधिकारी यांना रखडलेल्या वेतनाची  बाब निदर्शनास आणूनही वेतन न झाल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. काही दिवसांवर गणेशोत्सव देखील घेऊन ठेवला आहे. असे असताना वेतन न झाल्यामुळे गणेशोत्सव तरी कसा करावा, असा प्रश्नही या कर्मचार्‍यांना समोर उभा राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here