विजयदुर्ग किल्ल्यावर ‘हेलियम डे’

0

विजयदुर्ग : विजयदुर्ग येथे मिनी तारांगणाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्‍वास कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष व माजी आ. प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग येथे हेलियम डे कार्यक्रमावेळी व्यक्‍त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोकण विभागातील सात जिल्ह्यांमधील 15 पर्यटनस्थळांचा विकास करणार असल्याचे जठार यांनी सांगितले. विजयदुर्ग येथे गेली 12 वर्षे सुनीता शांताराम ट्रस्ट आणि विजयदुर्ग ग्रामस्थ यांच्या वतीने हेलियम डे साजरा करण्यात येत आहे. विजयदुर्ग किल्ल्यामधील साहेबाचे ओटे या ठिकाणी पुष्प अर्पण करून विश्‍व हेलियम डे साजरा करण्यात आला. यावेळी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ या घोषणांनी किल्ला परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष प्रमोद जठार, नेहरू तारांगणाचे शास्त्रज्ञ एस. नटराजन, युवा नेते संदेश पारकर, सभापती जयश्री आडिवरेकर, पं.स. सदस्य रवींद्र तिर्लोटकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, युरेका सायन्स क्लब कणकवली सुषमा केणी, राजश्री धुमाळे, संदेश सावंत, गिर्ये सरपंच रूपेश गिरकर, नगरसेवक सुभाष धुरी, नगरसेविका सौ.हर्षा ठाकूर, प्राजक्‍ता घाडी, भाजपा शहरअध्यक्ष योगेश पाटकर, वाघोटन सरपंच कृष्णा आमलोसकर, इतिहासप्रेमी राजेंद्र परूळेकर, पवन परूळेकर, प्रदीप साखरकर, ग्रा.पं.सदस्य सौ.संपदा लेले, सौ. योगिता परूळेकर, सौ.संजना आळवे आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, विज्ञानातील एका शोधाचा वाढदिवस तोही विजयदुर्ग याठिकाणी होत आहे. विजयदुर्ग हे या शोधाचे पाळणाघर आहे. यामुळे गेली 12 वर्षे येथे हा विज्ञान दिन साजरा होत असून दरवर्षी या कार्यक्रमाचा वाढता आलेख पाहून भविष्यात येथे मोठे विज्ञान केंद्र होण्याचे स्वप्न नक्‍की पूर्ण होईल. विज्ञानदृष्ट्या महत्त्व असलेल्या या हेलियम डे  निमित्त  कुडाळ येथील बालवैज्ञानिक निहार मुंज याला त्याने केलेल्या शोधासाठी  मिळालेल्या गोल्ड मेडलमुळे त्याचा सत्कार करण्यात आला. भविष्यात येथे असेच अनेकजण वैज्ञानिक बनावेत, अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्‍त केली. सुषमा केणी म्हणाल्या, विज्ञानाचा वापर हा योग्यप्रकारे करून घेता आला पाहिजे. सध्याच्या इंटरनेटच्या जीवनात मोठ्या प्रमाणात होत असणारा मोबाईलचा वापर चांगल्या प्रकारे करून मुलांनी जागतिक माहिती मिळवण्यासाठी करून घेतला पाहिजे. एस.नटराजन यांनी हेलियम विषयी माहिती सांगून विजयदुर्ग येथे नेहरू तारांगण व शासनाच्या सहकार्याने मिनी तारांगण होण्यासाठी नक्‍की प्रयत्न करेन असे आश्‍वासन दिले. ज्याच्याकडे व्हिजन आहे तेथे यश नक्‍की आहे यामुळे येथे हे तारांगण नक्‍की होईल अशी भावना संदेश पारकर यांनी व्यक्‍त केली. यानिमित्त विजयदुर्ग एस.टी.डेपो ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत ढोलताशांच्या गजरात विजयदुर्ग येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हुर्शी शाळा, प्राथमिक शाळा, ग्रामस्थ तसेच शिक्षक, सिंधुभूमी फांऊडेशन व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रमोद जठार यांची  कोकण पर्यटन विकास समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here