दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात झालेला पाऊस वर्षानुवर्षे आठवणीत राहील. मुसळधार पाऊस आणि धरणाच्या पाण्याचा विसर्ग यामुळे तिलारी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी, अनेकांच्या घरात शिरलेले पाणी यानंतर उद्भवलेली पूर परिस्थिती अजूनही अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही. यामध्ये पिढ्यानपिढ्या स्वमेहनतीने केलेल्या माड, पोफळी, केळीच्या बागा पुराच्या पाण्याबरोबर क्षणार्धात वाहून गेल्याने शेतकर्यावर सध्या बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. शासनाकडून मिळणार्या तुटपुंज्या भरपाईवर शेतकर्यांचे नुकसान कधीच भरून न येणारे आहे. ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस सर्वत्र पूर करून गेला. तालुक्यात मुसळधार पावसामुळे तिलारी धरण तुडुंब भरले होते, तर दुसर्या बाजूने पावसाचा जोर कायम होता. यानंतर जलसंपदा विभागाने कल्पना न देताच धरणाचे चारही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला आणि एकच हाहाकार उडाला. याचा 11 गावांना जबरदस्त फटका बसला. अनेक कुटुंबांना काहीच समजले नसल्याने सर्वच कुटुंबे घरात अडकून पडली. पहिल्यांदा स्थानिक ग्रामस्थांनी घरेदारे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर कळविल्याने एनडीआरएफच्या टीमने पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी स्थलांतर केले होते. तिलारी नदीच्या बाजूला असलेल्या घोटगे, वायंगणतड, साटेली-भेडशी, कुडासे, वानोशी, मणेरी, सासोली, आवडे आदी गावांना पुराच्या पाण्याने अक्षरशः वेढले होते. याचबरोबर स्वमेहनतीने केलेल्या बागायतीसुद्धा वेगाने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या. पूर ओसरल्यानंतर दिसणारे चित्र पाहून शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. कारण एखादी बाग तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते आणि क्षणार्धात पुराच्या पाण्यात माड, केळी, पोफळी आदी झाडे वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून पंचनामे झाले, पण नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तिलारी नदीच्या पात्रानजीकच्या गावांची पाहणी केली असता जिथे केळीच्या बागा होत्या, तिथे आता मोकळा भाग दिसतो आहे. तसेच लागवडयोग्य माड मुळासकट वाहून गेलेत. शेतकरी आपल्या बागायतीत जातात तेव्हा निराश होऊन माघारी फिरतात कारण स्वमेहनतीने केलेल्या बागायती नष्ट झाल्या आहेत. बागायतीचे पंचनामे महसूल, कृषी विभागाकडून सुरू आहेत. शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई मिळेल, पण ती समाधानकारक नसणार. कारण लागवडयोग्य नारळाच्या झाडाची नुकसानीची किंमत फक्त तीनशे रुपये मिळते. यावरून भरपाई म्हणजे जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार आहे, असे म्हणावे लागले. बहुतेक शेतकर्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. तिलारी नदी पात्रानजीकच्या अनेक सुपीक जमिनीत पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. यामुळे नदीपात्र आणखीन रुंद झाले आहे. जमिनीची भरपाई कोण देणार? असा सवाल शेतकर्यांमधून उपस्थित होत आहे.
