चांद्रयान-2 या मोहिमेत 7 सप्टेंबर या दिवशी ऑर्बिटरपासून वेगळे होऊन लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याच ठिकाणाची का निवड केली, असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. चांद्रमोहीम फत्ते केलेल्या अमेरिका, रशिया आणि चीनचे पाऊल या भागात पडलेले नाही. चंद्राच्या या भागाची अत्यंत जुजबी माहिती संशोधकांना असल्याने ‘चांद्रयान-2’ मुळे जगाला त्याची नवी माहिती मिळू शकेल. ‘चांद्रयान-1’ मोहिमेत याच दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या स्वरूपातील पाण्याची माहिती संशोधकांना मिळाली होती. त्यावेळेपासूनच या भागाविषयीचे कुतुहल वाढले होते. आता भारताने आपले लँडर याच भागात उतरवल्यावर भारताचा जगभरातील अंतराळ क्षेत्रामधील दबदबा आणखी वाढेल. असे म्हटले जाते की ‘चांद्रयान-2’ च्या माध्यमातून भारत एका अशा अनमोल खजिन्याचा शोध लावू शकतो ज्याचा माणसाला पुढील 500 वर्षांपर्यंत ऊर्जेच्या पूर्ततेसाठी उपयोग होईल. इतकेच नव्हे यामुळे अब्जावधी डॉलर्सची कमाईही होऊ शकते. चंद्रावरून मिळणारी ही ऊर्जा केवळ सुरक्षितच नव्हे तर तेल, कोळसा आणि अणुऊर्जेच्या कचर्यापासून होणार्या प्रदूषणापासून मुक्त असेल.