‘नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल’; मुश्रीफ यांचा दावा

अहमदनगर : ‘करोनाचा प्रादूर्भाव सुरूच असून काही भागात तो वाढतोय, हे खरे आहे. तरीही आता पुन्हा लॉकडाऊन करण्याचा अजिबात विचार नाही. यापुढे करोनासोबतच जगावे लागेल, मात्र लोकांनी आजार अंगावर काढू नये, लक्षणे दिसताच कोविड सेंटरला यावे,’ असे आवाहन करतानाच ‘नोव्हेंबरअखेरपर्यंत हे सर्व संपुष्टात येईल,’ असा विश्वास ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यात करोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी आज तेथे भेट देऊन आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘नगर जिल्ह्यात सुरवातीला करोनाचे आकडे वाढले होते. नंतर ते कमी झाले. मात्र, लॉकडाउन शिथील झाल्यावर बाहेरच्या जिल्ह्यातून लोकांचे येणेजाणे वाढले आणि आकडे पुन्हा वाढत गेले. संगमनेर तालुक्यात हे प्रमाण जास्त आहे. येथे मृत्यूचा दरही ९ टक्के आहे. तो आपल्याला कमी करायचा आहे. यापुढे लॉकडाऊन वगैरे काहीही केले जाणार नाही. आपल्याला करोनासोबतच जगत त्याचा सामना करण्याची सवय लावून घ्यायची आहे. मात्र हा आजार अंगावरही काढायचा नाही. लक्षणे दिसताच दवाखान्यात जावे. येथे करोनाची लागण जास्त झाल्याचे दिसत असले तरी लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ९० ते ९५ टक्के आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नयेत, मात्र नियमांचे पालन करावे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. येथे आता टेस्ट वाढविण्यात येणार आहेत. सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत,’ असं मुश्रीफ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here