कणकवली : वाघ, बिबट्यांचे वारंवार हल्ले होऊन व्यक्ती आणि शेतीचे नुकसान होत असलेल्या वनालगतच्या संवेदनशील गावांच्या वनसीमेवर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात येणार आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून प्रायोगिक तत्त्वावर हे कुंपण लावण्यात येणार आहे. 2019-20 आणि 2020-21 या वर्षात 100 कोटी निधीच्या मर्यादेत ही योजना राबविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच याला मान्यता दिली आहे. जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पाकता वाढवणे, ग्रामस्थांची वनावरील निर्भरता कमी करून शेतीविषयक व्यवसायाला चालना देणे आणि त्यामाध्यमातून मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविली जाते. व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्र व वन्यजीव संरक्षित क्षेत्राच्या सीमेपासून 2 कि.मी. आतील भागातील गावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे वन्यप्राण्यांना पुरेशे संरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. अशा गावात वन्यप्राण्यांचा प्रादुर्भाव वाढत असून वन्यप्राण्यांच्या वारंवार हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने अशा संवेदनशील गावांना वनसीमेलगत लोखंडी जाळीचे कुंपण देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर वनविभागातर्फे लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या गावात वाघ किंवा बिबट्यासारख्या प्राण्यांचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि शेतीच्या नुकसानीची प्रकरणे जास्त आहेत, अशा निवडक गावांच्या वनसीमेवरच हे कुंपण करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसभेच्या ठरावासह प्रस्ताव उपवनसंरक्षक, विभागीय अधिकारी यांना सादर करावा लागणार आहे. त्यावर त्यांना परिस्थितीचा आढावा घेऊन वनसंरक्षक किंवा मुख्य वनसंरक्षक यांना मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे. कुंपणाची उभारणी करताना वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासोबतच जाळीमुळे शिकारीचा प्रकार किंवा जाळीमध्ये विद्युत प्रवाह सोडण्याची घटना घडल्यास ही जाळी काढून अन्य गावात लावण्यात येणार आहेत. एकूणच वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी ही लोखंडी कुंपणे आता कितपत उपयोगी ठरतात हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
