रत्नागिरी : कोकेन तस्करी प्रकरणी शेवटचा आठवा आरोपी येत्या 8 दिवसांच्या आत पकडण्याच्यादृष्टीने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे नियोजन आहे. या गुन्ह्यातील 5 आरोपी राज्याबाहेरचे असल्याने हा तपास पोलिसांना तसा महागातच पडत आहे. या प्रकरणाच्या तपासावर आतापर्यंत सुमारे दीड ते दोन लाख रुपये हरियाणा, राजस्थान येथून आरोपींना पकडून आणण्यातच खर्च करावे लागले असावेत असा अंदाज आहे. त्याचबरोबर राज्याबाहेरुन आरोपींना रत्नागिरीत आणताना फारच जोखीम असते. त्यामुळे रत्नागिरीत येईपर्यंत पोलिसांना त्या आरोपींना दादा-बावा करीत प्रवास करावा लागतो. रत्नागिरी एमआयडीसीत 20 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून 50 लाख रुपये किंमतीचे 936 ग्रॅम कोकेनसह हरियाणातील दिनेश शुभेसिंह, तटरक्षक दलातील सुनील रणवा, रामचंद्र मलिक यांना पकडण्यात आले. 20 हजार ते 2 लाख रुपयेपर्यंतच्या हव्यासापोटी या गुन्ह्यात भाग घेणारे तिघेजण पोलिसांच्या कचाट्यात सापडले. रत्नागिरीत शोधल्या गेलेल्या गिर्हाईकाला विकण्यासाठी एकत्र आलेले तिघेजण स्वत:च गिर्हाईक बनले. त्यानंतर पोलिस तपासात साखळी जोडत हरियाण, राजस्थानमधील 4 आरोपींना पकडून आणण्यात आलेल्या अंकित सत्यवीरसिंह (रा. राजस्थान), मुकेश शेरॉन (रा. चेन्नर्ई), अभिनव प्रेमसिंह (राजस्थान), संजय चौहान (राजस्थान) अशी त्यांची नावे आहेत. आता शेवटचा बजरंग नावाचा आरोपी सापडणे बाकी आहे. राज्याबाहेरुन आरोपीला आणताना तो प्रवासात स्वत:चे बरे-वाईट करण्याच्या किंवा पळून जाण्याच्या मन:स्थितीत असतो. अशावेळी त्या आरोपीला दादा-बावा करीत त्याचे खाण्यापिण्याचे लाड पुरवित सुरक्षित पोलिस ठाण्यापर्यंत आणावे लागते. आरोपी राज्याबाहेरचे असल्याने त्याठिकाणी जाणे, राहणे व इतर प्रवास खर्च करावा लागतो. राज्याबाहेर जावून आरोपींना आणायचे असल्यास कमीत कमी 4 ते 5 जणांचे पथक आवश्यक असते. आरोपी तावडीत सापडेपर्यंत तेथेच राहून वाट पहावी लागते. अशा या खर्चापोटी तपास करणार्या ग्रामीण पोलिसांचे किमान दीड ते दोन लाख रुपये खर्च झाले असावेत असा तर्क लावला जात आहे. आता मात्र बजरंग नावाचा एकच आरोपी ताब्यात येणे राहिल्याचे समजते. त्यामुळे आता कोकेन तस्करी प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे.
