कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेसमधून गोवा बनावटीचे मद्य जप्त

0

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर  कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून शनिवारी रात्री गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले. रेल्वे पोलीस बलाचे पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांनी केलेल्या या कारवाईत इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या सुमारे लाखभर रूपये किमतीच्या 556 बॉटल जप्‍त करण्यात आल्या. ही मद्य वाहतूक बोगीतील स्वच्छतागृहाच्या कप्प्यातून लपवून करण्यात येत होती. कोचुवेलीकडून डेहराडूनच्या दिशेने जाणार्‍या गाडीमध्ये मडगाव सोडल्यानंतर एक व्यक्‍ती जनरल डब्याच्या स्वच्छतागृहात बराचवेळ असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांना मिळाली होती. शनिवारी सकाळी आठ वाजता ही रेल्वे मडगावमधून सुटली होती.  सकाळी दहा वाजता ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली. यावेळी मधाळे यांनी सापळा रचत, या गाडीच्या जनरल डब्याला घेराव घातला. त्यानंतर पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांनी स्वच्छतागृहाची पाहणी केल्यानंतर त्यांना एका बाजूला प्लायवूड लावलेले आढळले. प्लायवूडचे स्क्रू ढिले असल्याने पोलिसांनी काढून पाहिले. त्यावेळी प्लायवूडच्या आतील बाजूला गोवा बनावटीच्या 556 बॉटल ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तातडीने आतील बॉटल बाहेर काढण्यात आल्या. परंतु याच कालावधीत गाडी चिपळूणच्या दिशेने मार्गस्थ झाल्याने तीन कर्मचारी गाडीसोबत चिपळूणच्या दिशेने पाठविण्यात आले.  रत्नागिरी, चिपळूण मार्गावर त्यांनी गाडीतील 492 बॉटल बाहेर काढल्या. सायंकाळी त्या बॉटल घेऊन पोलीस कर्मचारी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर दाखल झाले. सुमारे एक लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची ही दारू जप्त करण्यात आली आहे. दारू वाहतूक करणारी व्यक्ती रेल्वेतून पळून  गेल्याने पोलिसांच्या हाती लागली नाही. ही कारवाई निरीक्षक अजित मधाळे यांच्या नेतृत्वाखाली अप्पाराव ठकनवार,   जिजाब उबरहडे, गजानन बोडके, राकेश कुमार, रवी कुमार, शंकर मधाळे, रोहिदास भालेराव, विजय सुरडकर, विठ्ठल खंडागळे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here