मॉस्को : कुत्रा हा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याच्या इमानदारीचे अनेक किस्सेही सांगितले जातात. मात्र, रशियातील या कुत्र्याने जे केले आहे ते ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. येथील एक कुत्रा तब्बल 200 किलोमीटर चालत पुन्हा मालकाच्या घरी पोहोचला आहे. या कुत्र्याचे नाव मारू असे आहे. कुत्र्याच्या मालकाने मारूची अॅलर्जी असल्याचे सांगत त्याला दुसर्याला विकले होते. सहा महिन्यांच्या मारूला घेऊन त्याचा नवीन मालक ट्रेनमधून दुसरीकडे चालला होता. तथापि, मारू याने स्वतःला कसेतरी सोडवून घेतले आणि एका रात्री एका स्टेशनबाहेर तो उतरला.
अंधारामुळे तो तिथून कधी निघून गेला कुणाच्याच लक्षात आले नाही. जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याच्या शोधासाठी पथके पाठवली गेली. अडीच दिवसांच्या शोधानंतर मारू सापडला; पण तो होता त्याच्या मूळ मालकाच्या घरात. ज्याने त्याला विकले होते. या काळात मारूने जवळपास 200 किलोमीटरचे अंतर कापले होते. त्यामुळे तो खूप थकलाही होता. त्याचा एक पाय मोडला होता. सैबेरियाच्या जंगलातून त्याला प्रवास करावा लागला होता. त्यामुळे त्याच्या अंगावर ठिकठिकाणी जखमांचे व्रणही होते. तथापि, या कुत्र्याचे आता सर्वांना कौतुक वाटत आहे.